पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा ! - देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2021

पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा ! - देवेंद्र फडणवीस



मुंबई, 12 मे - राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, देशातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल.

या कोरोना साथीच्या काळात रूग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. यासंदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad