मुंबईचा ऑक्सिजन नवी मुंबई, ठाण्याकडे वळवला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2021

मुंबईचा ऑक्सिजन नवी मुंबई, ठाण्याकडे वळवला



मुंबई - वाढत्या रुग्णांमुळे देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर पुरेसा ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. असे असताना पुरवठादार कंपन्यांकडून मुंबईसाठी आलेला ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई साठी वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादाराला नोटीस बजावली आहे.मुंबईतील रुग्णालयातील रुग्णांना सध्या ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. 

रुग्णांना ऑक्सिजन अभावी अडचणी येऊ नयेत यासाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याच्यादृष्टीने राज्य सरकार व पालिकेचा प्रयत्न सुरु आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवावे लागले होते. अशा स्थितीत मुंबईच्या वाट्याला आलेले ऑक्सिजन नवीमुंबई, ठाणे येथे वळवण्यात आल्याने ११४ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पाच दिवसांमध्ये शहरात पोहोचू शकला नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या प्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादाराला नोटीस बजावली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांचे याकडे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

ऑक्सिजनची मागणी आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी ऑक्सिजनचा वाटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईसाठी २३४ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होतो. तीन ठिकाणच्या उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येणारा प्राणवायू सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला मिळतो. पालिका हा साठा आपआपल्या रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांना पुरवते. नवी मुंबई, ठाणेसाठीही हीच कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन नवीमुंबई, ठाणेसाठी पुरवठा केल्याचे समजल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिका-याने कंपनीला भेट देऊन पाहणी केली. मुंबईला पुरवठा होणारा ऑक्सिजन पूर्ण मिळावा यावर देखरेख करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकांची रबाळे येथील सतरामदास गॅसेस कंपनी परिसरात नेमणूक करावी, अशी विनंती पालिकेने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त, तसेच कोकण विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादार सतरामदास गॅसेस कंपनीला नोटीसही बजावली आहे. मुंबईच्या वाट्याचा इतर शहरांना दिलेला ऑक्सिजन सात दिवसांच्या आत परत करावा, असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 
....
मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन नवी मुंबई, ठाणेकडे वळवण्यात आला. याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार एकाच दिवशी झाला. पुढे असा प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad