मुंबई - गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरचा एक हजार पाचशे बेडचा टप्पा -२ लवकरच कार्यान्वित होणार असून या कामाची महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. ही तिसऱ्या लाटेसाठी तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, पालिका सर्वच ठिकाणी रुग्णशय्येची संख्या वाढवित असून त्यानुसार गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये पंधराशे रुग्णशय्येचा टप्पा -२ लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून या संपूर्ण कामाची महापौरांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी नेस्को जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुख डाँ. निलम आंद्राडे तसेच टप्पा -२ चे डॉ. संतोष सलाग्रे उपस्थित होते.
महापौर पेडणेकर यांनी सर्वप्रथम येथील वाँररूमची तसेच साहित्य भांडाराची पाहणी केली. त्यानंतर आयसीयू विभागाचे सीसीटीव्हीद्वारे करण्यात येणाऱ्या सनियंत्रण कामाची पाहणी करून आयसीयू विभागातील रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली.
त्यानंतर टप्पा -२ च्या कामाची पाहणी केली.
पालिका तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जम्बो कोविड सेंटर व इतर ठिकाणी सातत्याने रुग्णशय्या वाढविण्यावर भर देत आहे. त्याचपद्धतीने गोरेगाव येथील जम्बो कोविड सेंटर येथे पंधराशे रुग्णशय्येचा टप्पा-२ लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित डॉक्टर, कर्मचारी व संबंधित नर्सिंग स्टाँफ व इतर सर्व सोयी-सुविधा यांची संपूर्ण तयारी झाली असून या संपूर्ण कामाची पाहणी करण्यासाठी याठिकाणी आले असल्याचे महापौरांनी सांगितले.
पंधराशे रुग्णशय्येमध्ये एक हजार ऑक्सीजन रुग्णशय्या व इतर ५०० रुग्णशय्या राहणार आहे. त्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन, लहान मुलांसाठी स्वतंत्र चारशे रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात येणार असून त्याचेसुद्धा काम सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. पालिकेची संपूर्ण यंत्रणा एक टीम वर्क म्हणून या संपूर्ण कामांवर लक्ष ठेवून असल्याचे महापौरांनी सांगितले.
No comments:
Post a Comment