मुंबई - लक्षद्वीप येथील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौती' वादळाची तीव्रता वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवर शनिवारी, रविवारी व सोमवारी 'तौती' चक्रीवादळ धडकणार असून १६ आणि १७ मे रोजी मुंबईच्या किनारपट्टीवरही जोराचे वारे वाहणार आहे. यातच काही ठिकाणी पाऊस आणि ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मुंबई, ठाणे व पालघरला 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. समुद्र खवळल्याने या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. १५ तारखेला या तौती चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला तर १६ व १७ मेला मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. तर समुद्र खवळल्याने या भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ''तौती' वादळाची तीव्रता अधिक वाढणार आहे. ''तौती' वादळ हे नाव म्यानमार या देशाने ठेवले आहे. शनिवारी, १५ मे रोजी कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर १६ व १७ मेला मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील काही भागात अति मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबई ठाणे रायगड पालघर भागात ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
या वर्षातील हे पहिले वादळ असून, राज्यात कोरोनाच्या संकटातच हे संकट चालून आल्याने यंत्रणेवर याचा मोठा ताण येईल, असे सांगितले जाते. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना निसर्ग वादळाचा सामना करावा लागला होता. निसर्ग वादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान सोसावे लागले होते. या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
१४ मे ते १६ मे या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांना वादळाचा तडाखा बसेल तर १६ मे रोजी तो महाराष्ट्र, गोवा किनार्यावर तो धडकेल. किमान तीन दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने किनारपट्टीवरील मासेमारी रोखण्याच्या सूचना मेरीटाईम बोर्डाला देण्यात आल्या आहेत.
चक्रीवादळासाठी मुंबई महापालिका सज्ज! -
कोकण किनारपट्टीवर शनिवारपासून 'तौती' चक्रीवादळ धडकणार असून १६ आणि १७ मे रोजी मुंबईच्या किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहणार आहेत. यातच काही ठिकाणी पाऊस आणि ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मुंबईत 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही सर्व चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड तसेच आपत्कालीन स्थितीसाठी सातही अग्निशमन केंद्रांवर साधनसामग्रीसह जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. नरिमन पॉइंट, नाना चौक, दादर, अंधेरी, कुर्ला, मालाड, बोरिवली अशा आपत्कालीन अग्निशमन केंद्रांवर टेट्सस्कि, बोट, रोफ आदी साधनसामग्रीसह जवान तैनात ठेवण्यात आले आहेत.
'एनडीआरएफ'ची मदत घेणार! -
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणि एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास गरज भासल्यास 'एनडीआरएफ'सह पोलीस, नेव्ही, कोस्टल विभागाकडून मदत घेतली जाईल अशी माहिती पालिकेचे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी दिली.
मच्छिमारांना इशारा -
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रात जाऊ नये असे निर्देश देण्यात आल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment