पालघर - अखेर ‘त्या’ बेपत्ता वृद्ध इसमाचा शोध लागला. त्यांचा मृत्यू झाल्याचे काल वालीव पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना सांगितले. पण या सर्व घडामोडीत काहीतरी काळेबेरे आहे. महानगरपालिकेचे अधिकारी व ज्या कोविड सेंटरमधून हा वृद्ध इसम गायब झाला, त्या सेंटरचे वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी व्हायला हवी. त्याच्या नातेवाइकांना अंधारात ठेवून त्यांची तुळींज कोविड सेंटरमध्ये रवानगी करणे, त्यानंतर त्यांच्या मृत्यूची खबर त्यांच्या नातेवाइकांना न देणे व त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणे, हे सारे संशयास्पद असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. तेव्हाच या घटनेतील सत्य समोर येऊ शकेल.
वसई पश्चिमेस राहणारे रामचंद्र दास यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे महानगरपालिकेच्या वसईतील वरुण कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांची चौकशी करण्यास सेंटरमध्ये गेले असता ते सेंटरमध्ये नसल्याचे आढळून आले. ते कुठे गेले, त्यांचे काय झाले, अशी विचारणा केली असता नातेवाइकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सतत सांगितले जात होते. अखेर काल त्यांच्या नातेवाइकांना वालीव पोलीस ठाण्याहून फोन आला व पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यावेळी त्यांना रामचंद्र दास यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार संशयास्पद असून मनपा अधिकारी या प्रकरणी लपवाछपवी करत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
हा सारा घटनाक्रम लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. नातेवाइकांना किंवा दास यांच्या ज्या शेजाऱ्यांनी कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे दास याना तुळींज कोविड सेंटरमध्ये स्थलांतरित केले, परंतु त्यांना दुसऱ्या सेंटरमध्ये हलवताना जी कागदपत्रे तयार करायला हवी होती, ती तयार करण्यात आली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ही बाब उघड झाली. त्यानंतर त्यांचा झालेला मृत्यू व अंत्यसंस्कार याविषयी त्यांनी संबंधितांना का कळवले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे रामचंद्र दास यांच्या मृत्युप्रकरणी महानगरपालिका अधिकारी काहीतरी लपवाछपवी करत आहे, असा संशय बळावत चालला आहे. एका वृद्ध इसमाचा महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे जीव जातो व त्यांच्या नातेवाइकांना त्याची साधी माहिती मिळू शकत नाही. याची चौकशी होऊन दोषी मनपाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
No comments:
Post a Comment