लसींचा थांगपत्ता नाही, केंद्रांच्या उद्घाटनांचा मात्र सपाटा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2021

लसींचा थांगपत्ता नाही, केंद्रांच्या उद्घाटनांचा मात्र सपाटा



मुंबई - लसीकरण मोहिमेला मुंबईत १६ जानेवारीपासून सुरुवात झाली; परंतु पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रांवरून लस न घेताच परत फिरावे लागत आहे. मुंबईत लसीचा तुटवडा असल्याने मुंबईकरांना लस कधी मिळणार याचा पत्ता नसताना महापौरांनी आणि नगरसेवकांनी मात्र लसीकरण केंद्रांच्या उदघाटनांचा सपाटा लावला आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे लसींचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. नंतर राज्य सरकारतर्फे मुंबई पालिकेला लसींचा पुरवठा करण्यात येतो. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली; परंतु कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता, लसीकरणात मुंबई कशी अव्वल आहे हे दाखविण्यासाठी नियोजनशून्य कारभार केला गेला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावरून लस न मिळाल्याने पुन्हा घरी परतावे लागत आहे. लस उपलब्ध आहे की नाही, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने भल्या पहाटे केंद्रांवर पोहोचलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांच्या मोठमोठाल्या रांगा लागत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजी दिसत अाहे अाणि दुसऱ्या बाजूला लसीकरण केंद्रांचे उद्घाटन करण्याचा सपाटा सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे; परंतु कोविन अॅपच्या गोंधळामुळे काही मिनिटांतच नोंदणी प्रक्रिया बंद पडते. त्यामुळे नागरिकांना नोंदणी करणे शक्य होत नाही. तसेच विलेपार्ले येथील शिरोडकर रुग्णालयात शुक्रवारी नोंदणीकृत फक्त ६ जण उपस्थित असल्याने लसीची बॉटल उघडणे शक्य झाले नाही. लस घेण्यासाठी ६० वर्षांवरील व व्याधीग्रस्त नागरिकांना नियमित सुरू असलेली औषधे दोन दिवस आधी घेणे बंद करावे लागते. त्यात लस मिळत नाही आणि औषधोपचार बंद अशी स्थिती होते. लस मिळत नसल्याने गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंदणीअभावी दुसरा डोस ६० दिवसांत मिळाला नाही, तर पहिली लस घेण्यात काहीच अर्थ नाही, अशी भीती नागरिकांना सतावत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad