मुंबईत `म्युकरमायकोसिस` आजाराचा प्रवेश, विविध रुग्णालयात १११ रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2021

मुंबईत `म्युकरमायकोसिस` आजाराचा प्रवेश, विविध रुग्णालयात १११ रुग्ण



मुंबई, दि. १२ - मुंबईत कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हे असतानाच आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने मुंबईत प्रवेश केला आहे. कान, नाक आणि घसा यांच्याशी संबंधित असलेल्या या आजाराने मुंबईच्या विविध रुग्णालयात १११ रुग्ण दाखल आहेत. कोरोनाशी लढताना दमछाक होत असतानाच आता या नव्या आजाराशी सामना करावा लागत असल्याने पालिका आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

मागील वर्षभर पालिकांच्या आरोग्य खात्याबरोबरच शासनाचे आरोग्य खातेही कोरोनाशी निकराचा लढा देत आहे. पहिली लाट शमत असतानाच दुसरी लाट फारच भयंकर धडकली. दुसऱ्या लाटेशी लढा देताना गेले तीन महिने पालिका आरोग्य यंत्रणेबरोबर शासनाची आरोग्य यंत्रणाही हैराण झाली. मात्र गेल्या पंधरा दिवसात रुग्णसंख्या घटत असून आरोग्य यंत्रणा सुटकेचा निश्वास सोडत असतानाच आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने मुंबईसह महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईकरांबरोबर पालिका प्रशासन हैराण झाले आहे.

भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला म्युकरमायकोसिस आजाराबाबत माहिती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबई शहरात या आजाराचे १११ रुग्ण आढळल्याचे सांगितले. या रुग्णांपैकी शीव रुग्णालय ३२, केईएम रुग्णालय-३४, नायर रुग्णालय-३८ व कूपर रुग्णालयात ७ रुग्ण दाखल आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. बुरशीजन्य असलेला हा आजार सुदैवाने संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनाच याबाबतच्या उपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गटही तयार करण्यात आला आहे.
 
कोविडमध्ये मधुमेही रुग्णांना जास्त काळजी घ्यावी लागत होती. त्याप्रमाणे या आजाराताही मधुमेही रुग्णांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. म्युकरमायकोसिस या आजारावर वापरण्यात येणाऱ्या ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शने व इतर औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया झाली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनापेक्षा भयंकर -
कोरोनाबाधित रुग्णाला ७ ते १० दिवस उपचार आणि नंतर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. म्हणजे जास्तीत जास्त पाऊण महिना लागतो. मात्र म्युकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांना ८ ते १२ आठवडे (सुमारे १०० दिवस) डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे कोरोनापेक्षाही हा आजार भयंकर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad