मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची घेतली भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2021

मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची घेतली भेट



मुंबई - कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून मुंबईतील निवासी डॉक्टर काम करीत असताना त्यांना अद्याप वाढीव विद्यावेतन मिळालेले नाही. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे याबाबत रविवारी मार्डच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान या मागण्यांबाबत लवकरच राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असून लवकरच न्याय मिळेल असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

राज्य सरकारने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करत, विद्यावेतनात सप्टेंबर २०२० मध्ये दहा हजार रुपये वाढ केली. परंतु मुंबई महापालिकेने राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ लागू केली नाही. मार्डने सातत्याने मागणी केल्यानंतर १२ मार्चला वेतनवाढीला मंजुरी देण्यात आली. परंतु ही वेतनवाढ सप्टेंबरपासून न देता १ मेपासून दिली असून, कोरोनाकाळात दिलेले वाढीव वेतन हेच विद्यावेतनवाढ आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, कोरोना काळात एक वर्षापेक्षाही अधिक काळ अखंड सेवा जीव धोक्यात घालून देत असताना पालिकेने ऐनवेळी आपली भूमिका बदलली आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

जून महिन्यापासून देण्यात आलेला कोविड भत्ता हा पगारवाढ समजून देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पण संबंधित कोविड भत्ता हा प्रोत्साहनपर असल्याचे डॉक्टरांच्या संघटनेचा दावा आहे. तेव्हा शासनाने दिलेली वेतनवाढ सप्टेंबरपासून देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी डॉक्टरांची आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सामुहिक रजेवर जाण्याचा इशाराही मार्डने दिला होता. मात्र तरीही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे या मागण्याबाबत न्य़ाय मिळण्यासाठी डॉक्टरांच्य़ा शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्यासमोर गा-हाणे मांडले. दरम्यान, राज ठाकरे यांनी या मागणीला पाठिंबा दिला असून याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

मुंबईत एकूण ३ हजार डॉक्टर आहेत. डॉक्टरांना वेतनवाढीतील वेतन मिळालेले नाही. याशिवाय विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. याशिवाय वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फीदेखील आकारली आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला न्याय भेटावा म्हणून आम्ही राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांनी या संदर्भात न्य़ाय़ मिळेल असे आश्वासन दिले आहे. गेल्या दोन दिवासांपासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करतो आहे. कोरोना रूग्णांना त्रास होणार नाही यांची आम्ही काळजी घेत आहोत, असेही मार्डकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad