मुंबई - मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेने आरोग्यसेवा उपलब्ध केली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या १० हजारापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने वॉर्ड वॉर रुम पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड कमी पडू नये यासाठी बेड आणि इतर आरोग्यसेवांबाबत पालिकेने नियोजन केले आहे. लक्षणे आणि सहव्याधी नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका नसल्याने त्यांना कोविड बेड देऊ नका असे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत. लक्षणे व सहव्याधी असलेल्या गरजू रुग्णांना बेड कमी पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
वॉर्ड वॉर रुमला कळवल्याशिवाय कोविड रुग्णांना थेट बेड देता येणार नाहीत. वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातूनच बेड दिले जातील. त्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जावी, असेही आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये, नर्सिंग होम या ठिकाणी लक्षणे नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोविड पेशंटला सरसकट बेड देऊ नयेत अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडू नये यासाठी खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आणि १०० टक्के आयसीयू बेड पालिकेकडून ताब्यात घेतले जाणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून गेल्या दीड महिन्यात ८५ हजार बाधितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५,५०० लोकांनाच लक्षणे होती. लक्षणे असलेल्यांपैकी ८००० लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सध्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ३ हजार बेड रिकामे आहेत. तर खासगी रुग्णालयात ४५० बेड रिकामे आहेत. बंद केलेले जम्बो कोविड सेंटर पालिका पुन्हा सुरू करणार आहे. तसेच जम्बो कोविड सेंटरमध्ये ९००० बेड उपलब्ध होतील. पुढच्या काही दिवसांत दरदिवसाची रुग्णसंख्या १० हजारांवर जाईल. मात्र त्या संख्येत बेड लागणार नाहीत. ज्यांना रुग्णालयात नेण्याची गरज पडेल त्यांच्यासाठी बेड्स पुरेसे असतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment