मुंबई - मुलुंड पश्चिम येथील कोविड सेंटरवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांचे हाल होत आहेत. या केंद्रात फक्त ४०० आयसीयू खाटा असल्याने यापेक्षा अधिक रुग्णांना आयसीयू खाटांची गरज भासल्यास दुसरे कोविड सेंटर किंवा रुग्णालयांमध्ये हलवावे लागते आहे. त्यामुळे मुलुंड जकात नाका येथे नवीन कोविड सेंटर बांधत असून तेथे तब्बल ४०० आयसीयू खाटा ठेवल्या जाणार आहेत. या केंद्राचा मुलुंड करोना केंद्रासाठीही वापर होणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
मुलुंड करोना केंद्रात १६०० खाटा असून त्यात फक्त ४०० आयसीयू खाटा आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णवाढ होत असल्याने अत्यवस्थ रुग्णांना वेळेत आयसीयू खाटा मिळत नसल्याची तक्रार रुग्ण करत आहेत. शुक्रवारी मुंबईत ५३ बाधितांचा मृत्यू झाला. त्यात १४ रुग्ण मुलुंड कोविड सेंटरमधील आहेत. मुलुंड पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात दररोज नवीन रुग्णांची भर पडते आहे. या भागात गेल्या वर्षी जंबो करोना केंद्र बांधण्यात आले असून त्यातील सेवासुविधा वाढवल्या असल्या तरी मागील काही दिवसांपासून या केंद्रावरील ताण वाढत चालल्याने खाटा उपलब्ध होत नसल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत. या केंद्रावर ठाणे, कल्याण, डोंबिवलीपासून रुग्ण येतात.
मुलुंड भागात सध्या दररोज एक हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागते आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे, अशी माहिती या भागातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली. फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडते आहे. त्यामुळे खाटांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक बनले आहे. याकरिता पालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गंगाधरे यांनी केली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुलुंड करोना केंद्रावर ताण येत असल्याचे सांगितले. त्यासाठी जकात नाका येथील पालिकेच्या जागेवर लवकरच नवीन करोना केंद्र उभारले जाणार असल्याचे काकाणी म्हणाले.
No comments:
Post a Comment