मुंबई - मुंबईची लोकसंख्या वाढत असल्याने मुंबई करांची पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसमोर पाण्याच्या पुरवठ्याचीही समस्या निर्माण झाली आहे. मुंबईला पाण्याची कमतरता जवळपास १० ते १५ टक्के एवढी भासते आहे. यावर उपायासाठी पालिकेने समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याबाबत निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी सहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. प्रकल्पाचा एकूण ३५०० कोटीचा खर्च येणार आहे. या कामासाठी इस्रायलमधील कंपनीने स्वारस्य दाखविले असून प्रतिदिन २०० दशलक्ष लीटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पालिकेचा आहे.
मुंबईकरांना मुबलक पाणी पुरवठा करता यावा यासाठी मुंबई महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहे. य़ा पार्श्वभूमीवर समुद्राच्या खा-या पाण्याचे गोडे पाणी करण्याच्यादृष्टीने पालिकेने तयारी सुरु केली आहे. इस्रायलच्या एका कंपनीने या प्रस्तावासाठी सहा हेक्टर भूखंड लागणार असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीस २०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रकल्प भविष्यात ४०० दशलक्ष लीटर एवढा करण्यासाठी एकूण आठ एकर भूखंड लागणार आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आठ महिने आणि प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्यास ३० महिन्यांचा कालावधी लागेल. प्रकल्प अहवालात भूपृष्ठीय सर्वेक्षण, भूभौतिकशास्त्रीय-समुद्र शास्त्रीय सर्वेक्षण, किनारपट्टी नियमन क्षेत्रीय अभ्यास आदींचा समावेश असेल. या संपूर्ण दैनंदिन २०० दशलक्ष लीटर पाणी प्रक्रियेच्या प्रकल्पासाठी भांडवली खर्च म्हणून १,६०० कोटी आणि २० वर्षांसाठी १९२० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
या संपूर्ण प्रकल्पात इस्त्रायलच्या संबंधित कंपनीस सल्लागार म्हणून नेमले जाणार आहे. त्यानंतर स्विस चॅलेंज पद्धतीने निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यास इस्रायलच्या कंपनीस सहभागही होता येणार आहे.
यापूर्वीही पालिकेत खाऱ्या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्यात करण्याच्या प्रकल्पांविषयी सातत्याने चर्चा करण्यात आली आहे. त्यावेळीही, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी येणार खर्च प्रचंड होऊन ते पाणी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी महागडे ठरेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment