मुंबई - बच्चे कंपनीची आवडती राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार पासून सुरु झाली आहे. राणीबागेत पक्षी, प्राणी आणि झाडे पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र आता याच राणीबागेचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे. "द मुंबई झू" या नावाने सुरू करण्यात आलेले सोशल मीडिया पेज म्हणजे मुंबईसाठी मानाचा आणखी एक तुरा असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
विविध शैक्षणिक कार्यक्रम, प्राणिसंग्रहालयात होणारे इतर कार्यक्रम प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहचविण्या करीता, राणीबागेची माहिती नागरिकांना आणि पर्यटकांना मिळावी यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे फेसबुक, यु ट्यूब, ट्विटर, इंस्टाग्रामवर सोशल मीडिया पेज "द मुंबई झू" या नावाने सुरू करण्यात आले. या सोशल मीडिया पेजचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज प्राणि संग्रहालयाच्या थ्रीडी प्रेक्षागृहामध्ये पार पडले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर म्हणाल्या की, स्वतःच्या मालकीचे असलेले वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व प्राणीसंग्रहालय तसेच स्वतःच्या मालकीचे धरणे असलेली व पाणी व्यवस्थापन असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही एकमेव महापालिका आहे. प्राणिसंग्रहालयात कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी वृंद मनापासून काम करून येथील दुर्मिळ वनस्पती व विविध प्रजातींचे संरक्षण करीत असल्याचे महापौर म्हणाल्या. प्राणिसंग्रहालयात असलेल्या दुर्मिळ वनस्पती तसेच प्रजातींचे वैज्ञानिक महत्व तसेच आध्यात्मिक महत्व या दोन्ही बाबींचा उल्लेख आपल्या सोशल मीडिया पेजवर घेण्याची सूचना महापौरांनी यावेळी प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना केली.
कर्मचारी, प्राण्यांचे चित्रीकरण करा -
या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी प्राण्यांना कशाप्रकारे हाताळतात त्यांची प्राण्यांसोबत बोलण्याची भाषा, हातवारे या संपूर्ण बाबींचे चित्रीकरण करून याचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया पेजवर घेण्याची सूचनाही महापौरांनी यावेळी केली. महापालिकेचे प्राणिसंग्रहालय हे फार मोठे आकर्षणाचे केंद्रबिंदू असून ज्या देशांसोबत तसेच राज्यांसोबत आपले बोलणे सुरू आहे, तेथील प्राणी, पशु वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आणण्यासाठीचा पाठपुरावा सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. सद्यस्थितीत प्राणिसंग्रहालयात असलेले प्राणी, पशू बघण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.
उपयोगी अशी माहिती मिळणार -
राणी बागेच्या या सोशल मिडिया पेजवर राणी बागेशी संबंधित माहितीबाबत विद्यार्थ्यांच्या काही शंका असल्यास त्यांचे शैक्षणिक दृष्ट्या काही शंकानिरसन करणे, राणी बागेतील प्राणी, पक्षी, हेरिटेज वास्तू आदिबाबतची माहिती देण्यात येणार आहे,असे राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment