मुंबई - ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकाराच्या गाईडलाईन प्रमाणे मुंबई महानगरपालिकेने विमानतळावर उपाययोजना केल्या. 21 ते 23 डिसेंबर दरम्यान प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच घरी गेलेल्या प्रवाशांपैकी 4 जण पॉझिटिव्ह आल्याचे उघड झाले आहे. यामुळे विमानतळावरील तपासणीपूर्वी घरी गेलेल्या प्रवाशांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेताना मुंबई महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
कोरोनाला हरवण्याच्या कामात पालिकेला यश येत असतानाच ब्रिटनमध्ये नवा कोरोना स्ट्रेन समोर आला. या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबरनंतर देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करून त्यांना हॉटेल आणि कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. मुंबई विमानतळावर 21 ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटन आणि युकेमधून सुमारे 1 हजार 650 रुग्ण उतरले असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. दरम्यान, 25 नोव्हेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. 25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान सुमारे 2 हजार 648 हजार प्रवासी मुंबईत आले. या सुमारे 4 हजार प्रवाशांची चाचणी केली असता 26 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यापैकी 14 रुग्ण निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईकरांमध्ये मिसळले 4 पॉझिटिव्ह रुग्ण -
मुंबई विमानतळावर आलेल्या एकूण 26 पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले होते. या रुग्णांमध्ये ब्रिटनमधील कोरोनाची लक्षणे आहेत का याची जीनोम चाचणी करण्यात आली. त्यात राज्यातील 8 जणांमध्ये ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आढळून आली. यामध्ये मुंबईमधील 5 प्रवाशांचा समावेश आहे. मुंबईमध्ये जे 5 प्रवासी पॉझिटिव्ह आले त्यापैकी 4 प्रवासी हे 25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यानचे म्हणजेच विमानतळावर चाचणी कारण्यापूर्वीचे आहेत. तर 21 ते 23 डिसेंबर दरम्यानचा 1 रुग्ण आहे. हे प्रवासी मुंबईकरांमध्ये मिसळले असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या 40 मुंबईकरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार केले जातील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
पालिकेची उडाली तारांबळ -
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. 25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान आलेल्या 2 हजार 640 रुग्णांपैकी 1 हजार 190 प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. हा शोध लागला नसताना या प्रवाशांपैकी 4 प्रवासी नव्या कोरोना स्ट्रेनचे आढळून आले आहेत. या प्रवाशांचा शोध घेण्याचे काम स्थानिक वॉर्ड कार्यालय, आरोग्य विभागाकडून केले जात आहे. या प्रवाशांचा शोध लागत नसल्याने परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती पालिकेला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान या प्रवाशांचा शोध घेताना पालिकेची तारांबळ उडाल्याचे दिसत आहे.
2 निगेटिव्ह -
मुंबईत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांपैकी 2 जण निगेटिव्ह आले आहेत. तर इतर 3 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काकाणी यांनी केली.
No comments:
Post a Comment