मुंबई - मार्चपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उद्यापासून (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. कोरोनादरम्यान गेल्या वर्षभरात मुंबईकरांनी चांगली साथ दिली आहे. आताही ट्रेन प्रवासासाठी दिलेल्या वेळेचे पालन करून मुंबईकर नक्की साथ देतील, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुंबईमधील लोकल ट्रेन उद्यापासून सुरू होत आहे. त्यासाठी वेळेचे बंधन घातल्याने मनसेकडून टीका करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना महापौर बोलत होत्या. महापौर म्हणाल्या की, कोरोना दरम्यान मुंबईकरांनी साथ दिली. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे. लोकल ट्रेन सुरू झाल्यावर १० टक्के लोक जे राजकीय पक्षांशी संबंधित आहेत ते याचे पालन करणार नाहीत. मात्र ९० टक्के मुंबईकर ठरवून दिलेल्या वेळेतच प्रवास करून स्वत:चे तसेच आपल्या कुटूंबाचे रक्षण करतील. मुंबईकर गेल्या वर्षभराप्रमाणे आताही साथ देतील, अशी प्रतिक्रिया महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.
१० महिन्यांनी ट्रेन सुरू -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. तेव्हापासून गेले दहा महिने सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास बंद करण्यात आला होता. मुंबईत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर उद्या १ फेब्रुवारीपासून लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सकाळी सातच्या आधी, सकाळी ११ ते सायंकाळी ४, रात्री ९ नंतर सर्वसामान्य मुंबईकरांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment