मुंबई काँग्रेसतर्फे 'माझी मुंबई माझी काँग्रेस' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2021

मुंबई काँग्रेसतर्फे 'माझी मुंबई माझी काँग्रेस'



मुंबई - काँग्रेसच्या 'माझी मुंबई माझी काँग्रेस' या १०० दिवसांच्या कार्यक्रमाला १६ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे, तसेच १६ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मुंबईच्या ६ जिल्ह्यामंध्ये "कार्यकर्ता मेळाव्यांचे" आयोजन करण्यात येणार आहे. तसेच २६ जानेवारी पासून मुंबईच्या १०० वॉर्डांमध्ये "पदयात्रा कार्यक्रमाचे" आयोजन करण्यात आलेले आहे. जिथे जिथे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, त्या वॉर्डांमध्ये व त्यांच्या आजूबाजूच्या वॉर्डांमध्ये पदयात्रा काढून प्रत्येक प्रभागातील विविध समस्या, त्याबाबत काँग्रेसची भूमिका व धोरणे जनतेपर्यंत नेण्यासाठी हा पदयात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेमध्ये भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर उपस्थित होते. 

याबद्दल अधिक माहिती देताना भाई जगताप म्हणाले की, "माझी मुंबई माझी काँग्रेस" या १०० दिवसांच्या कार्यक्रमाला १६ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. १६ जानेवारी पासून मुंबईच्या ६ जिल्ह्यांमध्ये "कार्यकर्ता मेळाव्याच्या" माध्यमातून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. १६ जानेवारी रोजी उत्तर मुंबई, २३ जानेवारी रोजी उत्तर मध्य मुंबई, २४ जानेवारी रोजी ईशान्य मुंबई, २८ जानेवारी रोजी दक्षिण मध्य मुंबई आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबई व त्याचदिवशी उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्यांमध्ये "कार्यकर्ता मेळाव्याचे" आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच २६ जानेवारी २०२१ पासून मुंबईतील १०० वॉर्डांमध्ये पदयात्रा कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. त्याची सुरुवात मुंबई मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या सायन कोळीवाडा विभागातून होणार आहे. त्या विभागात काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. पदयात्रेचे रूपांतर नंतर मोठ्या सभेमध्ये होणार आहे.

भाई जगताप पुढे म्हणाले की, आज मुंबईत ६८ टक्के नागरिक झोपडपट्टी व चाळीमध्ये राहतात. त्यांना मोफत पाणी महापालिकेकडून मिळालेच पाहिजे, अशी आमची काँग्रेसतर्फे मागणी आहे. तसेच मुंबईतील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी असलेल्या सदनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्याचा ठराव २०१९ - २०२० या आर्थिक वर्षांत महापालिकेने करून सुद्धा राज्य सरकारकडून दोनदा शासन निर्णय काढून फक्त १० टक्के सर्वसाधारण कर माफ करण्यात आला. मुंबई काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे की, ५०० चौरस फुटांपेक्षा कमी असेलेल्या सदनिकांच्या मालमत्ता करात १०० टक्के सूट २०२० ते २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत देण्यात यावी. जेणेकरून सर्वसामान्य मुंबईकरांना त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. तसेच ५०१ ते ७०० चौरस फूट सदनिकांच्या मालमत्ता करांत ६० टक्के सूट देण्यात यावी, अशी मुंबई काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे.

भाई जगताप पुढे म्हणाले की, आज मुंबईत १० हजार पेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांना १५ जानेवारी २०२१ पर्यंत डीम्ड कन्व्हेयन्स देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना त्यांचे डीम्ड कन्व्हेयन्स मिळाले. परंतु त्यातील तांत्रिक अडचणी व कागदपत्रांची मागणी यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्स मिळविण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणून आमची अशी मागणी आहे की डीम्ड कन्व्हेयन्स मिळण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढविण्यात यावी. जेणेकरून सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना कॉन्व्हेयन्स मिळविण्यात अडचण होणार नाही व सर्वसामान्य मुंबईकरांना त्यामुळे दिलासा मिळेल. तसेच गृहनिर्माण संस्थांच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन करण्यात यावी. कारण आज कोविडमुळे सर्व गोष्टी ऑनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. आज शिक्षणसुद्धा ऑनलाईन दिले जाते. बैठका, सेमिनार सुद्धा ऑनलाईन घेतल्या जातात. तसेच जीएसटी, इन्कम टॅक्स ऑनलाईन भरतो, मग रजिस्ट्रेशन प्रक्रिया का नाही ?. आमची मुंबई काँग्रेसतर्फे अशी मागणी आहे की, गृहनिर्माण सोसायट्यांच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन करण्यात यावी. त्यामुळे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा जलद व सुलभ होईल व रजिस्ट्रेशन साठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad