मुंबई - मुंबईतील लसीकरणाची व्याप्ती वाढवत लसीकरणाला वेग देण्यासाठी मुंबई महापालिकेने कोविड सेंटरमध्येही लसीकरण केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊन दोन दिवस उलटले नाहीत तोच बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्र तयार ही झाले आहे. तर येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला जोरात सुरुवात ही झाली आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे नियोजन करत दिवसाला तीन हजार लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांनी दिली.
सर्व कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्र -
मुंबईतील सायन, नायर, केईएम आणि कूपर या मुख्य रुग्णालयांसह कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, राजावाडी आणि ट्रॉमा केअर अशा 8 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र मुंबई महानगर पालिकेने दिवसाला 50 हजार लसीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तेव्हा हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता 8 केंद्र पुरेशी नाहीत असे म्हणत रविवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील सर्व कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्र तयार करण्याचे जाहीर केले. त्यानुसार रविवारीच तसे आदेश सर्व कोविड सेंटरच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत.
15 युनिट एका दिवसात तयार -
रविवारी आदेश मिळाल्यानंतर लगेचच बीकेसी कोविड सेंटर कामाला लागले. ज्याप्रमाणे या कोविड सेंटरची उभारणी काही दिवसातच करण्यात आली. त्याचप्रमाणे आता लसीकरण केंद्र ही एक ते दीड दिवसात पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान येथे 15 युनिट तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक युनिटमध्ये 3 रूम आहेत. नोंदणी साठीची रूम, लस टोचवण्यासाठी रूम आणि लस टोचवलेल्या व्यक्तीच्या देखरेखीसाठी रूम अशा या रूम आहेत.
आयसीयूचे 9 बेडही तयार -
बीकेसीतील लसीकरण केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे या केंद्रात 9 आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. लस दिल्यानंतर एखाद्या रुग्णाला काहीही त्रास होऊ लागला तर त्वरित त्याला आयसीयूमध्ये योग्य ते उपचार दिले जाणार आहेत. येथे 24 तास डॉक्टर असणार आहेत असे ही डॉ डेरे यांनी सांगितले आहे.
गरज पडल्यास 24 तास सेवा देण्याची ही तयारी -
पालिकेने 50 हजार नागरिकांना दिवसाला लस टोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट मोठे असून ते पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास आणि पालिकेने आदेश दिल्यास आम्ही 24 तास लसीकरण सेवा देण्यास तयार आहोत, असेही डॉ डेरे यांनी सांगितले आहे. दरम्यान नेस्को कोविड सेंटरमध्येही 10 युनिट तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरच हे युनिट ही तयार होतील अशी माहिती डॉ नीलम आंड्राडे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment