मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन याबद्दल माहिती दिली आहे.
“ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे” असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.
ब्रिटन मधून भारतात परतलेल्या या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये नव्या कोरोना आजाराचे विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिरा भाईंदर येथील एक जण २१ डिसेंबर रोजी ब्रिटन मधून भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर तो आपल्या पत्नीसह गृह विलगीकरणात रहात होता. मात्र राज्य शासनाकडून ब्रिटन मधून आलेल्या नागरिकांची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेमार्फ़त या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणी अहवालात हा रुग्ण नव्या कोरोना आजाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
No comments:
Post a Comment