गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा – मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2021

गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा – मुख्यमंत्री


मुंबई, दि. 12 : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यायोगे सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अडीअडचणी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपाययोजना यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते.

बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींबाबत निधी, पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्या ठिकाणचे असलेले प्रश्न मार्गी लावत असतानाच प्रकल्पपूर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. गोसेखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असेही मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले.

जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण होऊन राज्यातील ओलित क्षेत्र वाढेल असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पूर्ण करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

यावेळी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माटे यांनी सादरीकरण करुन प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad