भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहनमंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून घटनेच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री डॉ. कदम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर वाचलेल्या बालकांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कुटूंबांना संपूर्ण मदत दिली जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय बंद राहणार नाही. तसेच ओपीडी नियमित सुरु राहिल यादृष्टीने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस दलाची मदत घेण्यात येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणालाही अडवू नका, असे निर्देशही देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment