मुंबई - वृक्ष संवर्धनासाठी राज्य सरकारने माझी वसुंधरा उपक्रम हाती घेतला असताना, आता मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्याना देखील वनीकरणाचे धडे दिले जाणार आहेत. इयत्ता पहिली पासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थांना एक झाड लावणे बंधनकारक असले. तसेच झाडाच्या संगोपनाची जबाबदारी सोपवण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. नागरी विकास कामांत अमर्याद वृक्षतोड होते. परिणामी प्राणवायुची कमतरता निर्माण होऊन वायु प्रदुषणात भर पडते. आगामी काळात परिस्थिती गंभीर असेल. दिवसेंदिवस होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्यासाठी वृक्षरोपणाची आवश्यकता आहे. भावी पिढीला वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देणे, वृक्ष जोपासणेची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मनपा शाळेतील इयत्ता १ ली पासून १० वीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावून त्याच्या संवर्धनाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडाचे नाव, उंची आणि छायाचित्राची माहिती प्रत्येक वर्षी शाळेत जमा करावी. तसेच त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्याना द्यावी. मनपा शाळेतील शिक्षकांनी या झाडांचे तुलनात्मक मुल्यमापन करुन श्रेणी द्यावी, अशी सूचना आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी महा सभेत केली आहे. प्रत्येक जन्मलेल्या मुलाबरोबर एका झाडाचे रोपण होईल. प्रत्येक बालका सोबत एक झाड जन्माला येईल, अशी ही संकल्पना आहे. विद्यार्थ्याना यामुळे वृक्ष संवर्धनास प्रोत्साहन मिळेल. झाडे लावा, झाडे जगवा योजनेलाही हातभार लागेल, असे मोरजकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment