मुंबई : पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला हे कार्यकर्ते धडकले. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले.
या हल्ल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे रक्तबंबाळ झाले आणि त्याच क्षणी तीनही आरोपींनी रिक्षातून पळ काढला. मात्र मागून येणाऱ्या पोलिसांनी या तिघांपैकी एक असलेल्या सचिनला पकडले. दिपू आणि आयुष तिवारी तिथून फरार झाले. सध्या पवई पोलीस या दोघांचा शोध घेत आहे. हे तिघेही भाजपचे कार्यकर्ते असून घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात कार्यरत आहेत अशी माहिती मिळाली आहे. हे तिघे भाजपच्या आयटी सेल आणि इतर विभागांसाठी काम करतात अशी माहिती आहे. या प्रकरणानंतर भाजपचे काही कार्यकर्ते पवई पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण असे गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई करत आहेत.
No comments:
Post a Comment