मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खार येथे कार्यालय खरेदी केलं आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी असल्याचं सूत्रांकडून समजतं. मात्र, या व्यवहाराचा राजकारण प्रवेशाशी कुठलाही संबंध नाही, असं खुद्द उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
खार पश्चिमेकडील ‘दुर्गा चेंबर्स’ इमारतीत उर्मिला यांनी हे कार्यालय घेतलं आहे. दुर्गा चेंबर्स ही सात मजल्याची इमारत आहे. इमारतीचा दर्शनी भाग काचेचा आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयांचे भाडे महिन्याला ५ ते ८ लाखाच्या मध्ये आहे. इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरासाठी आहे.
उर्मिला यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय खरेदी केलं असून ते सुमारे १०४० चौरस फुटांचं आहे. या जागेचा दर ३६ हजार प्रति चौरस फूट असल्याचं समजतं. राजेश कुमार शर्मा या उद्योजकाकडून उर्मिला यांनी हे कार्यालय खरेदी केलं असून २८ डिसेंबरला हा व्यवहार झाला. याविषयी उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयाचा रेडी रेकनरचा दर ४ कोटींहून अधिक आहे. या व्यवहारापोटी उर्मिला यांनी ८०,३०० रुपये मुद्रांक शुल्क भरले असून नोंदणीसाठी ३० हजार रुपये मोजले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढलेल्या उर्मिला यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत मतभेदातून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १२ उमेदवारांमध्ये उर्मिला यांच्या नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं.
No comments:
Post a Comment