नालेसफाईच्या कामासाठी ठेकेदार मिळेना, जुन्याच कंत्राटदाराला कंत्राट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2021

नालेसफाईच्या कामासाठी ठेकेदार मिळेना, जुन्याच कंत्राटदाराला कंत्राट



मुंबई - मुंबईतील नालेसफाई कामासाठी जानेवारीचे १५ दिवस संपायला आले तरी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. त्यामुळे जुन्याच ठेकेदारांना कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामाचा खर्चही मागील वर्षीपेक्षा वाढला असून यंदा ४७ कोटी सात लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मात्र, निविदा न काढता कंत्राटदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीत वाद रंगण्याची शक्यता आहे. 

पालिका यंदा पश्‍चिम उपनगरातील छोटया नाल्यांच्या साफसफाईसाठी ४७ कोटी ७ लाख रुपये खर्च करणार आहे. सन २०२० - २०२१ या वर्षासाठी पश्‍चिम उपनगरातील छोटया नाल्याच्या सफाईसाठी पालिकेने फेब्रुवारी २०२० पासून चारवेळा निविदा मागवल्या. मात्र निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने अशासकीय संस्थांच्या कामागारांकडून नालेसफाई करुन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोविडमुळे या कंत्राटदारांनीही काम करण्यास नकार दिला. कंत्राटदार मिळत नसल्याने अखेर २०१९- २०२० या आर्थिक वर्षात नालेसफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारांकडूनच हे काम करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.
मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी नालेसफाईच्या कामासाठी ४६ कोटी ५८ लाख रुपये खर्च केले होते. यावर्षी ४७ कोटी सात लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्यक्षात गेल्या वर्षी पालिकेने या कामासाठी ४३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला होता. मात्र विभागानुसार ठेकेदारांनी पाच ते २२ टक्के दराने जादा निविदा भरल्या होत्या. जुन्य़ाच कंत्राटदारांला विना टेंडर काम देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव अडचणीत येण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad