मुंबई - धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस जो निष्कर्ष काढतील त्यानंतर अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. पक्ष धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याविषयी तर्क वितर्क लढवले जात असतानाच जयंत पाटील यांनी मात्र मुंडेंच्या कारवाईबाबत काहीशी सावध भूमिका घेतली आहे.
धनंजय मुंडे यांना एक महिला ब्लॅकमेल करतेय याबाबत आधीच त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यामुळं पोलिसांनी याबाबत योग्य ती पावलं उचलावीत एवढ अपेक्षा होती. पण ती उचलली गेली नाहीत. म्हणून शेवटी ते हायकोर्टात गेले, अशी माहिती देतानाच. याबाबतची प्राथमिक चौकशी व्हावी. एखादी महिला राजकीय व्यक्तिमत्वाला बदनाम करत असेल, तर त्याचीही दखल घ्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याबाबत चर्चा होत आहे. पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पोलीस त्यांचं काम करतील. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, सध्यातरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. याबाबत पक्षातील इतर सहकाऱ्यांशी चर्चा करु आणि पक्ष म्हणून निर्णय घेऊ. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment