भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.
स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याच्या कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल असे सांगून टोपे म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बालकांच्या कुटुंबियांचे सांत्वन -
भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही जिल्हा रुग्णालयाला दिली भेट -
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा रुग्णालयात आज आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
No comments:
Post a Comment