मुंबई - कोरोनाचा विविध क्षेत्राला फटका बसला आहे. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तीनचाकी स्कूटर, झेराॅक्स मशीन व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिकेतर्फे आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी लाभार्थ्याने वैयक्तिक फक्त १५ टक्के रक्कम भरायची असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही रक्कम भरण्याइतकेही पैसे खिशात नसल्याने दिव्यांगांना वस्तूंची खरेदी करता आलेली नाही. त्यामुळे दिव्यांगासाठीचा कोट्यवधी रुपये पडून आहेत.
दिव्यांग, महिला व बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी पालिकेतर्फे तीनचाकी स्कूटर, झेराॅक्स, शिलाई, घरघंटी मशीन यासह विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी आर्थिक मदतीचा हात दिला जातो. लाभार्थ्याने संबंधित वस्तूसाठी कंपनी, दुकानात १५ टक्के रक्कम भरलेली पावती व संबंधित कागदपत्रे पालिकेला सादर करायची असतात. पालिका त्यावर ८५ टक्के रक्कम भरून लाभार्थ्याला विनापरतावा मदत करते. यंदाच्या वर्षी मुंबईतील एक हजार ७१ दिव्यांगांना तीनचाकी स्कूटर तर २६३ जणांना झेराॅक्स मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
यामध्ये तीनचाकी स्कूटरसाठी ३५१ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त तीन जणांनी तर झेरॉक्स मशीनसाठी २६२ पैकी ८५ जणांनी १५ टक्के रक्कम भरून खरेदी बिलासह उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. दिव्यांगांना होंडा अॅक्टीव्हा स्कूटर साईड व्हील लावून ८१ हजार ९४५ रुपयांना (जीएसटीसह) मिळणार आहे. त्यामुळे या रकमेच्या ८५ टक्के म्हणजे ७० हजार रुपये स्कूटर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिली जाणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना कोणत्याही ब्रँडच्या स्कूटरची खरेदी करता येईल व त्यास कोणत्याही सर्विस सेंटरकडून साईड व्हील्स बसवून घेण्याची मुभा आहे.
झेरॉक्स मशीनसाठी पात्र ठरलेल्या २६२ पैकी ८५ जणांनी १५ टक्के बिले भरून अनुदानासाठी अर्ज केला आहेत. झेरॉक्स मशीनकरीता सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कोरोनामुळे दिव्यांगांना या वस्तूंचे बुकिंग करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना घेता आलेला नसल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment