मुंबई - राज्याच्या काही भागात घबराट निर्माण करणाऱ्या बर्डफ्लूने मुंबईतही शिरकाव केला आहे. मुंबईत कावळ्यांचा मृत्यू हा बर्डफ्लूने झाल्याची धक्कादायक माहिती पुण्याच्या पशुसंवर्धन प्रयोग शाळेच्या तपासणी अहवालातून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना पालिकेने रात्री उशिरा जाहीर केल्या आहेत. बर्डफ्लूचा संसर्ग होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मांस आणि मटण विक्रेत्यांच्या दुकानांचे सर्वेक्षण करून स्वच्छता आराखडा तयार करून घ्यावा, असे निर्देश प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच मृत पक्षांची विल्हेवाट लावताना चुनखडीचा पुरेसा वापर करण्याचेही निर्देशात म्हटले आहे.
हेल्पलाईन क्रमांक -
राज्यात बर्डफ्ल्यूचा प्रसार होत असताना मुंबईतही 12 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार राज्य पशुसंवर्धन विभाग आणि महानगर पालिका यांच्या समन्वयाने बर्ड फ्ल्यू रोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मनपा हद्दीत पक्षांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास आपत्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारणासाठी आप्तकालीन विभाग, संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात अथवा वॉर रुममार्फत कार्यवाही केली जाणार आहे.
दुकानांचा स्वच्छता आराखडा -
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंताच्या आदेशानुसार कर्मचारी आणि कामगार मृत पक्षांची विल्हेवाट लावणार आहेत. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने त्वरित प्रतिसाद पथक नेमले आहे. यात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट खड्ड्यांमध्ये पुरून लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना खड्ड्यात पुरण्यासाठी पुरेसा चूनखडीचा वापर करणे आवश्यक असेल. मात्र खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मांस व मटन दुकानांचे सर्वेक्षण व संबंधित दुकानांचा स्वच्छता आराखडा तयार करण्याचे आदेश पालिकेच्या बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. वीर जिजामाता प्राणिसंग्रहायाने सेंट्रल झू ऑथोरिटीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मटण विक्रते, कुक्कुट पालक आणि नागरिक यांनी बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव व प्रसाराबाबत पशुवैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आयईसीअंतर्गत जनजागृती करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.
रॅपिड रिस्पॉन्स टीम -
मुंबईत मृत पक्षी आढळून येत आहेत. मात्र असे घटना दिसून आल्यास सरकारने नियुक्त केलेल्या त्वरित प्रतिसाद पथकातील (रॅपिड रिस्पॉन्स टीम) डॉ.हर्षल भोईर : 9987280921 आणि डॉ.अजय कांबळे : 9987404343 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
धोका नाही, पण काळजी घ्या -
बर्डफ्लूमुळे माणसांना काहीही धोका नाही, तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा पक्षी किंवा प्राणी मारून पडला असल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती पालिकेच्या विभाग कार्यालय किंवा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला द्यावी. कच्चा मांसाहार करू नये. मटण, चिकन, अंडी चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment