मुंबई - बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्ट उपक्रमाचे ३५० कोटी विकासकांकडे बिल्डरांकडे थकीत आहेत. त्यातच आता 'बायोमास' ऊर्जा बनवणाऱ्या कंपनीने बेस्टची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीविरोधात बेस्टने न्यायालयात १०२ कोटींचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवणार आहे.
बेस्टकडून परिवहन आणि विद्यूत उपक्रम राबवला जातो. स्वस्त विद्यूत मिळावी, म्हणून बेस्ट उपक्रमाने ऑगस्ट २००८ मध्ये एका कंपनीशी गुंतवणूक करार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली होती. बेस्ट उपक्रमाच्या ऊर्जा खरेदीची पूर्तता करण्याकरिता प्रतियुनिट पाच रुपये दराने बायोमास ऊर्जा खरेदी करण्याचे निश्चित झाले. या गुंतवणूक करारानुसार अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी २५ मेगावॅट क्षमतेचा बायोमास ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार होते. त्यासाठी एकूण ६० कोटी रुपये इतकी रक्कम सदर कंपनीकडे ठेव म्हणून ठेवण्यात आली. अटी व शर्तीसह २००९ साली बेस्ट उपक्रम आणि कंपनी यांच्या दरम्यान ऊर्जा खरेदी करारही झाला. कंपनीने ऊर्जा खरेदीच्या करारानुसार २४ महिन्यांच्या आत अटींची पूर्तता करणे गरजेचे होते. मात्र कंपनीने गुंतवणूक कराराच्या तारखेपासून प्रकल्प सुरू करण्यास विलंब केला. कंपनीने प्रकल्प उशिरा सुरू करतानाच विद्युत पुरवठाही केला नाही. त्यामुळे या कंपनीसोबत असलेला विद्युत करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी विरोधात दावा -
‘बायोमास’ ऊर्जेची निर्मिती करून त्याचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बेस्ट उपक्रमाने १२ वर्षांपूर्वी ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु हे काम हाती घेणाऱ्या कंपनीने ना ऊर्जानिर्मिती केली ना ‘बेस्ट’ला ऊर्जेचा पुरवठा. परिणामी गुंतवणूक केलेली रक्कम बुडाल्याने उपक्रमाने या कंपनीविरोधात न्यायालयात १०२ कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment