मुंबई - देशभरात बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण आहे. मुंबईत गेल्या नऊ दिवसात पक्षी मृत झाल्याच्या ५७८ तक्रारी पालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडे नोंद झाल्या आहेत. मृत पक्ष्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी माहिती बर्ड फ्ल्यू रोगासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महापालिका सतर्क -
बर्ड फ्ल्यूने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर राज्य आणि मुंबई महापालिका सतर्क झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मृत पक्ष्यांच्या अवशेषांचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. मृत पक्ष्यांमध्ये कावळ्यांची संख्या मोठी आहे. तर त्या खालोखाल कबुतरांची संख्या आहे. मात्र, हा रोग माणूस किंवा प्राण्यांमध्ये पसरू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईत पोल्ट्रीशी संबंधीत मोठे व्यवसाय नाही. त्यामुळे इतर शहरांप्रमाणे मुंबईला बर्ड फ्ल्यूचा धोका नाही. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळले तर अशा पक्ष्यांचे नमुने विशिष्ट टीमकडून गोळा केले जातात. कारण त्यात बर्ड फ्ल्यूचा संशय असतो. त्यांची वेगळया ठिकाणी विशिष्ट पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र, संख्या कमी असली तरीही खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी लावली जाते विल्हेवाट -
मृत पक्ष्यांची तक्रार पालिकेच्या आपतत्कालीन नियंत्रण कक्षाकडे आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पीपीई कीट घालून त्या जागेवर पोहोचतात. मृत पक्ष्याचे अवशेष पिशवीत गोळा केले जातात. पिशवीत विशिष्ट रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होते. ही पिशवी त्याच वाॅर्डमधील निर्जन ठिकाणी ५ फुटांचा खड्डा तयार करून पुरली जाते. त्यानंतर पुन्हा तो खड्डा माती आणि रसायनांनी बुजवला जातो. हा खड्डा कुत्रे किंवा इतर प्राणी उरकून काढू नये, यासाठी त्यावर दगड किंवा इतर वस्तू ठेवली जाते.
२४ तासात ३५६ तक्रारी -
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे ५ जानेवारीपासून पक्षी मृत झल्याच्या तक्रारी नोंद होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत गेल्या नऊ दिवसात पक्षी मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यापैकी बुधवारी सकाळी ७ ते गुरुवारी सकाळी ७ या २४ तासात ३५६ तर मंगळवार आणि बुधवारी २४ तासात १६९ पक्षी मृत पावल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मृत पक्षांमध्ये कावळा, कबुतर आणि चिमण्यांचा समावेश आहे. मरत पक्षांमध्ये कावळ्यांची संख्या जास्त असून चिमण्यांची संख्या कमी आहे. एकाच व्यक्तीकडून किंवा एकाच सोसायटीतील अनेक व्यक्तीकडून एकाच पक्ष्याबद्दलची माहिती आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे वारंवार फोन करून दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात पक्षी एक असूनही तक्रारींची संख्या वाढलेली असते. मात्र, प्रत्यक्षात संख्या कमी असते. तक्रारींची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा सद्यातरी उपलब्ध नाही, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
येथे साधा संपर्क -
मुंबईत मृत पक्षी आढळून येत आहेत. मृत पक्षी आढळून आल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. तसेच शासनाने नियुक्त केलेल्या रॅपिड रेस्पॉन्स टीममधील डॉ. हर्षल भोईर : 9987280921 आणि डॉ. अजय कांबळे : 9987404343 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
अशी घ्या काळजी -
१) कोणताही कच्चा मांसाहार टाळा.
२) कच्ची अंडी, कच्चे चिकन खाऊ नये, योग्य प्रकारे शिजवून घेणे आवश्यक आहे.
३) पोल्ट्री उद्योजकांनी, विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वच्छता पाळावी.
४) पशु, पक्षी यांच्याशी संपर्क टाळावा, त्यांची विष्ठा, लाळ यांच्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
५) घरातील पाळीव पशु, पक्षांची भांडी, पिंजरे स्वच्छ ठेवा.
६) उरलेल्या मांसाची योग्य ती विल्हेवाट लावावी.
७) एखादा पशु, पक्षी मरण पावलेला आढळला तर त्याला हात लावायचा नाही. त्याची सूचना पालिकेच्या आपत्कालीन विभागाला कळवावे.
No comments:
Post a Comment