आंतरजातीय विवाह, सुनेचा खून, सासऱ्यासह दोन रिक्षाचालकांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2020

आंतरजातीय विवाह, सुनेचा खून, सासऱ्यासह दोन रिक्षाचालकांना अटक



मुंबई - २४ डिसेंबर रोजी अक्सा बीचवर एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. सहा दिवसांनंतर या हत्येच्या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी महिलेच्या सासऱ्याला आणि दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे. नंदिनी ठाकूर (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. नंदिनीचा विवाह तीन वर्षांपूर्वी पंकज राय याच्याशी झाला होता. आंतरजातीय विवाह असल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. पंकजचे वडील कमल (वय ५५) यांना या लग्नामुळे त्यांच्या बिहारमधील मूळगावी अपमानित व्हावे लागले होते. काही महिन्यांपूर्वीच नंदिनीच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी एका रिक्षाचालकाला १ लाख रुपयांची ‘सुपारी’ दिली होती, असे कमलने पोलिसांना सांगितले. 

मालवणी पोलिसांना २४ डिसेंबर रोजी अक्सा बीचवर एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. तिच्या हातावर टॅटू होता. तिच्या गळ्यात नेकलेस आणि मंगळसूत्रही होते. आम्ही तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये या वर्णनाच्या महिलेबद्दल चौकशी केली. कांदिवली पूर्वेतून ती महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. समता नगर पोलिसांत तिचा फोटो होता. तिच्या गळ्यात तशाच प्रकारचा नेकलेस आणि मंगळसूत्र होते, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस तपास केला असता, पंकज आणि त्याची आई हे छटपुजेसाठी बिहारला गेले होते. त्यावेळी नंदिनी आणि तिचा सासरा कमल हे दोघेही घरी होते. कमलकडे चौकशी केली असता, त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. कमलच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, ९ डिसेंबरच्या रात्री कमल संपूर्ण रात्रभर रिक्षाचालक प्रदीप गुप्ता याच्यासोबत होता. त्यानंतर गुप्ता हा उत्तर प्रदेशात निघून गेला होता. गुप्ता आणि आणखी एक रिक्षाचालक कृष्णकांत सिंह हे ९ डिसेंबरला कमलच्या घरी आले होते. त्यांनी नंदिनीला पकडून ठेवले. त्यानंतर एकाने उशीने तिचे तोंड दाबले. तिचा मृत्यू झाल्यानंतर बेडशीटमध्ये तिचा मृतदेह गुंडाळला आणि बॅगमध्ये भरला. त्यानंतर तिघांनी तिचा मृतदेह फेकून दिला. या प्रकरणी कमल, गुप्ता आणि सिंह या तिघांना पोलिसांनी अटक केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad