मुंबई: 'मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या कसाबलाही फाशीच्या तख्तावर जाईपर्यंत माणुसकीने वागवले जाते, पण मनुष्याच्या जंगलात शिरलेल्या गव्यास बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन मारले जाते. एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं,' अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे.
वाट चुकून बुधवारी पुण्यात घुसलेल्या एका रानगव्याला आधी जेरबंद करण्यात आले. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. याबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. प्राणीप्रेमींनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेनंही 'सामना'च्या अग्रलेखातून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'आम्ही वाघ वाचवतो, साप वाचवतो. बिबटे, हत्ती वाचवतो, पण एका गव्यास निर्घृणपणे मारतो. याआधी रत्नागिरी, सांगली, वाळवा-शिराळा भागात गवा घुसला होता. भंडारा येथील गोसीखुर्द कालव्यात गवा पडला, तेव्हा दोरीचा फास टाकून लोकांनी त्यास बाहेर काढले. रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या गव्यासही वाचवले होते, मग पुण्यात शिरलेल्या गव्यावर तडफडून प्राण सोडण्याची वेळ का आली?,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.
'लोकांनी गव्यास दगड मारले, हाकारेहुकारे देऊन त्याला या गल्लीतून त्या गल्लीत पळवले. गव्याचा मेंदू पुणेकरांप्रमाणे तल्लख, टोकदार नव्हता. गव्याचा मेंदू जंगली होता. तो मिळेल तिथे धडका देत राहिला. त्यामुळं लोकांनी त्याला घायाळ केले. कळपात असेल तर गवाही वाघाला शिंगावर घेऊन आपटतो, पण पुण्यातील लोक हे वाघापेक्षा शूर झालेले दिसतात. त्यांनी एकट्यादुकट्या गव्यास ठार केले आहे. कोविड-१९ व लॉकडाऊन काळात जास्तच आराम फर्मावल्यामुळे पुणेकरांत हे जे हत्तीचे बळ संचारले आहे, त्याची दखल सरकारने वेळीच घ्यावी,' असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे.
'मनुष्य आहे तेथे रावण आहेच, पण रावणातही किमान माणुसकी होती. अशोकवनात सूक्ष्म रूपाने घुसलेल्या हनुमानाच्या शेपटीला त्याने फक्त आग लावली, निर्घृणपणे ठार केले नाही, पण आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
'जंगलातील चारापाणी संपले असावे. त्या भटकंतीत गवा पुण्यात शिरला तर त्याला मारण्यात आले. आमच्या जंगल खात्याच्या कर्मचाऱ्यांना असे प्रसंग हाताळण्याचे नीट प्रशिक्षण आहे काय? पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या रक्षणाबाबत सरकार जागरूक आहे. आरे जंगल, जंगलातील प्राणी वगैरे वाचविण्यासाठी सरकारने मेट्रो कारशेडची जागाच बदलली, वाघ बचाव आंदोलनात सरकार झोकून देते, मग रानगव्यास जगण्याचा अधिकार नाही काय?,' असे प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केले आहेत.
पदवीधर निवडणुकीच्या निकालाचा राग काढला काय? -
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात ही घटना घडली होती. त्यावरून शिवसेनेनं भाजपला टोला हाणला आहे. 'हे महाविकास आघाडीचे अपयश आहे, असा आरोप आता भाजपवाले करतील. पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच गव्यास मारले, असं रावसाहेब दानवे म्हणतील. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय?,' असा खोचक प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.
No comments:
Post a Comment