खारफुटीचे पालिकेने संरक्षण करावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2020

खारफुटीचे पालिकेने संरक्षण करावे



मुंबई - खारफुटीच्या कत्तलीमुळे मुंबईतील पर्यावरणावर मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे खारफुटीच्या संरक्षणासाठी महापालिकेत स्वतंत्र विभाग असावा, दक्षता पथकामार्फत खारफुटीवर लक्ष ठेवले जावे, अशी मागणी नगरसेवक व पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली आहे. खारफुटीवर अतिक्रमण करणा-यांवर कारवाईचे राज्य सरकारकडून पालिकेला अधिकार मिळावेत अशी सूचनाही करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहात मांडला जाणार आहे.

मुंबईत पूर्वी मोठ्या प्रमाणात खारफुटीची जंगले अस्तित्वात होती. मात्र अशा जंगलांवर बिल्डर आणि समाजकंटकांचे अतिक्रमण झाले. त्यामुळे खारफुटीचे क्षेत्र नष्ट होते आहे. ही जंगले वाचवण्यासाठी विविध पर्यावरणप्रेमी, संस्था विविध संघटनांचा प्रयत्न करत असतात. आता या सर्वांना साथ देण्यासाठी नगरसेवकही पुढे सरसावले आहेत. खारफुटीला संरक्षण मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

खारफुटीची जंगले संरक्षक भिंतीसारखी मानवी वस्त्यांचे संरक्षण करतात. तसेच त्सुनामी सारखी वादळे थांबवण्याची क्षमता खारफुटीमध्ये आहे. खारफुटी जैवविविधता जपतात. सागरी संवर्धनाचे काम करतात. जलचर, पाणथळ, पाण्यावर तरंगणारे विविध जीव खारफुटी परिसंस्थेच्या आश्रयाला असतात. तसेच खारफुटी पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठं काम करते. याकडे लक्ष वेधून मुंबई महापालिकेने त्वरीत पावले उचलायला हवीत, असे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.

आर्थिक गरजेसाठी काहीजण ही जंगले उद्ध्वस्त करीत आहेत. मुंबई शहराप्रमाणेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही ही कत्तल वाढली आहे. उद्यानात खारफुटीचा अधिसूचित भागाचा समावेश आहे. या जंगलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात खारफुटीची झाडे येथे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडांचे जतन आणि संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारची यंत्रणा खारफुटीच्या संरक्षणासाठी आहे. मात्र तरीही विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे विशेष दक्षता पथकाची नियुक्ती खारफुटीच्या क्षेत्रात करावी, अशी मागणी चौधरी यांनी या प्रस्तावाव्दारे पालिकेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad