मुंबई: मुंबईकरांना थंडीची चाहूल लागलेली असतानाच आज शहर व उपनगरांतील काही भागांत रिमझिम पावसानं हजेरी लावली. पहाटेच्या कामांसाठी व मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांची त्यामुळं काही वेळ तारांबळ उडाली.
सकाळी सहा वाजल्यापासून मुंबईतील दादर, माटुंगा आणि माहीम भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळं रस्ते ओलेचिंब झाले होते आणि वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पश्चिम उपनगरातही ९ वाजण्याच्या सुमारास हेच चित्र होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण लवकरच निवळेल, असा अंदाज आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातील कोथरूड व कोकणातही आज सकाळी पावसाच्या सरी हलक्या सरी कोसळल्या.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्रामध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. पावसाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्य दिवसांतही कुठे न कुठे पाऊस कोसळल्याचे पाहायला मिळते. त्यामुळं सर्वसामान्यांच्या मनातही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर दिसत आहे. आजच्या पावसानंतरही अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत गंमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
No comments:
Post a Comment