मुंबई, दि. ४ डिसेंबर २०२० - विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
आजच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला. या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण २४ जिल्ह्यात थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. कोल्हापूर व गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' देखील सुसाट होईल.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच मागील अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment