मुंबई - लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी एकाच दिवशी या दुर्घटनेतील ३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ वर पोहचला आहे. ३ जणांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
१६ जण जखमी -
प्राप्त माहितीनुसार, लालबाग साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीचे लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सकाळच्या सुमारास जेवण बनवले जाणार होते. मात्र रात्रीपासून गॅस गळती झाल्याने गॅस पेटवताच सिलेंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी सुशीला बांगरे (६२) आणि करीम (४५) यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.
एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू -
शुक्रवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मंगेश राणे (६१), सकाळी ९.२५ वाजता ज्ञानदेव सावंत (८५) यांचा तर दुपारी १.३० वाजता महेश मुणगे (५६) यांचा अशा तीन जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ५ वर गेली आहे. सध्या केईएम रुग्णालयात ४ जण तर मसीना रुग्णालयात ४ जण उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहीती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
३ जणांना डिस्चार्ज -
गॅस सिलेंडर स्फोटातील जखमींपैकी मिहिर चव्हाण (२०), प्रथमेश मुणगेकर (२७) या दोघांना ८ डिसेंबर रोजी तर त्यानंतर ममता मुणगे (४८) यांनाही बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment