कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी गाइडलाइन्स ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी गाइडलाइन्स !



पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जाहीर सभा, खाद्यपदार्थ आणि पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे समर्थन विविध संघटनांनी केले असून, नागरिकांनी विजयस्तंभाला घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान या ठिकाणी विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यामध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करण्यात आल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला राज्यभरातून नागरिक येत असतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध घालण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारची सभा घेणे, खाद्यपदार्थ व पुस्तकांचे स्टॉल लावणे यावरही निर्बंध घालण्यात आले असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या सूचनांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी राज्याच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, संबधित महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी व कार्तिकी वारी, गणेशोत्सव, नवरात्र, ईद हे सण साजरे करण्याबाबत खबरदारी म्हणून सूचना करण्यात आल्या होत्या. त्या धर्तीवर अभिवादन कार्यक्रमासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कक्षाधिकारी दीपक खरात यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, असे सूचविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad