मुंबई - कांदिवली पश्चिम चारकोप परिसरातील साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती, की काही क्षणात पसरली. त्यामुळे बाहेर पडता न आल्याने आगीत तीन जण होरपळले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कांदिवली पश्चिम चारकोप, बंदर पाखाडी रोड, गुरव जमुना इमारतीच्या समोर असलेल्या साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. आग पसरल्याने या मंदिरात झोपलेल्यांना तात्काळ बाहेर पडणे शक्य झाले नाही. मध्यरात्रीची वेळ असल्याने आसपासच्या परिसरातील रहिवाशीही झोपेत होते, त्यामुळे आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाल्याचे बोलले जाते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुभाष खोडे (२५), युवराज पवार (२५) या दोघांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर ९० ते ९५ टक्के भाजलेल्या मन्नू गुप्ता ( २६) याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुपारी दीडच्या सुमारास मन्नू यांचाही मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. त्यांना आधी कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने सायन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. दरम्यान, आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडून चौकशी केली जाते आहे.
No comments:
Post a Comment