मुंबई - मुंबईत लालबाग येथील साराबाई इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. गॅस सिलेंडरची तपासणी करून घ्यावी, तसेच गॅस लीकेजबाबत जागृत राहावे असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी कैलास हिवराळे यांनी केले आहे. तर पाईपलाईन द्वारे गॅस स्फोटाच्या घटना होत नसल्याने गॅस सिलेंडर ऐवजी गॅस पाईपलाईनद्वारे महानगर गॅसचा पुरवठा करता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
पाईपलाईन गॅस घराघरात पोहचवणार -
लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर पोहचला असून ५ जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. या दुर्घटनेत दोन कुटूंबातील दोन मुले वाचली आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी गॅस सिलेंडर ऐवजी पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा करण्याची गरज असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले आहे. गॅस सिलेंडरमधील गॅस हा जड असल्याने तो खाली जमिनीवर पसरून एखादी ठिणगी पडली तरी त्याचा स्फोट होतो. त्यामानाने पाईपलाईन द्वारे दिला जाणारा गॅस हा हलका असल्याने तो हवेत मिसळून जातो. यामुळे पाईपलाईन द्वारे पुरवठा केला जाणारा गॅस सुरक्षित असल्याने तो मुंबईकरांना दुर्घटनापासून वाचवू शकतो. पाईपलाईन द्वारे दिला जाणारा गॅस मुंबईकरांना मिळावा यासाठी त्याचे डिपॉझिट कमी करण्यासाठी प्रयत्न करून तो घराघरात पोहचावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
काळजी घ्या, जागृत राहा -
लालबाग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी कैलास हिवराळे यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गॅस सिलेंडर घेताना त्याचे सिल, तो लिकेज आहे का याची तपासणी करावी. वॉल्व्ह मधील वायसर योग्य आहे का आहे याचीही तपासणी करावी. गॅस सिलेंडर घेतल्यावर रेग्युलेटर लावून त्याचा वापर करून तपासावे. रात्री झोपताना रेग्युलेटर बंद करावे. सकाळी उठल्यावर लाईटीचे बटन न दाबत लाईट लावण्यापूर्वी गॅस लीक आहे का ते तपासावे. सिलेंडरमधील गॅस जड असल्याने तो खाली जमिनीवर पसरतो. हा गॅस दिसत नाही, त्यासाठी कंपनीने त्यात हायड्रोजन सल्फाइट सारखे द्रव टाकलेले असते. त्याचा वास येऊ शकतो. गॅस लीकेजचा वास आल्यास सर्वप्रथम खिडक्या उघडा खेळती हवा आत येऊ द्या. गॅस लिकेज नाही याची खात्री झाल्यावरच लाईटचे बटन सुरु करा असे आवाहन हिवराळे यांनी केले आहे.
रिकामा गॅस अधिक धोकादायक -
भरलेल्या सिलेंडरची काळजी घेतली पाहिजे तशीच काळजी रिकाम्या सिलेंडरची घेतली पाहिजे. रिकामा सिलेंडर हा सर्वात जास्त धोकादायक असतो. रिकामा गॅस सिलेंडर फ्रिज जवळ ठेवू नका. तो अडगळीच्या ठिकाणी ठेवू नका, खेळती हवा असलेल्या ठिकाणी ठेवा असे आवाहनही हिवराळे यांनी केले आहे. नागरिकांनी योग्य प्रकार काळजी घेतली तर गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याच्या दुर्घटना होणार नाहीत असे हिवराळे यांनी म्हटले आहे.
बेकायदेशीर सिलेंडरवर कारवाई सुरूच -
एखाद्याने बेकायदेशीर सिलेंडरचा साठा केला असल्याचा ती सिलेंडर जप्त करण्याची आणि दंडात्मक कारवाई कारण्याची कारवाई केली जाते. एखाद्याने बेकायदेशीर सिलेंडर ठेवल्याची तक्रार केल्यास कारवाई केली जाते. अशी कारवाई करताना वैद्यकीय अधिकारी, लायसन्स विभागाचे अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई केली जाते. या कारवाई दरम्यान बेकायदेशीर सिलेंडर जप्त केली जातात असे हिवराळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment