मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष व मुंबई कॉंग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी आज केले. त्याचवेळी सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन या नावात फातिमा शेख यांचा नावाचा समावेश करून सावित्रीबाई फुले व फातिमा शेख महिला शिक्षण दिन असा उल्लेख करावा अशी मागणी खान यांनी केली आहे.
यावेळी नसीम खान म्हणाले की, ज्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांना शिक्षित करण्याकरीता शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. मुलीना शिक्षित करण्याकरीता त्यांना खूप अडचणीना सामोरे जावे लागले, तरीदेखील आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि मुलीना शिक्षण देण्याचे महान असे कार्य केले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात त्यांना मोलाची साथ देणाऱ्या शिक्षिका फातिमा शेख याचेही योगदान विसरण्यासारखे नाही. पुण्यात ज्या घरात मुलींची शाळा सुरु करण्यात आली त्या मुस्लीम बांधव उस्मान शेख यांची बहिण फातिमा शेख होत्या आणि सावित्रीबाई फुले यांचाकडून शिक्षण घेऊन शिक्षिका बनणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील त्या पहिल्या मुस्लीम शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला-खांधा लाऊन फातिमा शेख यांनीही मुलीना शिक्षण मिळावे म्हणून खूप संकटांना व अडचणीना सामना केला होता.
त्यामुळे नसीम खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली की, सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन या नावात फातिमा शेख यांचा नावाचा समावेश करून सावित्रीबाई फुले व फातिमा शेख महिला शिक्षण दिन असा म्हणून साजरा करावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांच्याही कार्याची माहिती मिळेल असे खान यांनी म्ह्टले आहे.
No comments:
Post a Comment