सरकारी कार्यालयात जीन्स, टी शर्ट, स्लिपरवर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2020

सरकारी कार्यालयात जीन्स, टी शर्ट, स्लिपरवर बंदी



मुंबई - राज्य सरकारने मंत्रालयासह सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे आदेश काढले आहेत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख असावी, यासाठी ठराविक रंगाचा ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून सरकारी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती यांनाही हा ड्रेसकोड लागू असणार आहे.   

सामान्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात हजर राहताना ड्रेस कोड सक्तीचा होणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी कार्यालयात टी शर्ट जीन्स, गडद रंगाचे कपडे तसेच नक्षीकाम अथवा विविध प्रकारच्या डिझाईन असलेले कपडे वापरता येणार नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरकारी कार्यालयातील कर्मचारी ठरवून दिलेल्या ड्रेस कोडमध्ये दिसणार आहेत.

काय म्हटले आहे परिपत्रकात? -
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, सरकारी कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी-कर्मचारी (प्रामुख्याने कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती) हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना कर्मचाऱ्याला अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.

सर्व सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो.

असा असेल ड्रेस कोड -
१) महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार,चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा.

२) पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान कर नयेत.

३) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करु नये. केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.

एक दिवस खादी -
खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी यापूर्वीच्या परिपत्रकान्वये कर्मचाऱ्यांना त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

स्लीपर वापरण्यास बंदी - 
महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करु नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad