मुंबई - कोरोनाची लस आल्यावर प्रथम आरोग्य कर्मचा-यांना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेली ब्लू प्रिन्ट शुक्रवारी टास्कफोर्सच्या पहिल्या बैठकीत सादर करण्यात आली. लसीकरण तीन टप्प्यात दिली जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांना लस कशा प्रकारे द्यावी, दुष्परिणाम झाल्यास काय करावे, या प्रकारचे प्रशिक्षण पालिका रुग्णालयातील दोन हजारांहून अधिक पॅरामेडिकल स्टाफला देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत सिरम इन्स्टिट्युट व भारत बायोटेक कंपनीची लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. लसीकरणासाठी पालिकेने ब्लू प्रिंट तयार केली आहे. शुक्रवारी मुंबई महापालिकेत टास्कफोर्सच्या झालेल्य़ा पहिल्या बैठकीत लसीबाबतच्या नियोजनावर ब्लू प्रिंट सादर करण्यात आली. लसीकरणाचे तीन टप्पे ठरले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांना दिली जाणार असून त्यासाठी एक लाख २५ हजार कर्मचा-यांची नोंदणी करण्यात आली आहे. केईएम, नायर, कूपर आणि सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात लसीकरणाची केंद्रे असतील.कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर लस कोरोना बाधित रुग्णांना कशा प्रकारे द्यावी, त्या लसीचे मुंबईत कशा प्रकारे वितरण करावे याचे नेटवर्क तयार करणे, डाटा बॅंक, कोरोना बाधित रुग्णांना लस दिल्यावर काही दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले तर काय करावे प्रकारे याबाबतचे पालिकेच्या २,२४५ पॅरामेडिकल स्टाफला प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर त्या लसीचा साठा कांजूर येथील पालिकेच्या मार्केट इमारतीत करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे व दक्षिण मुंबईत ही लस स्टोरेजची जागा बघत असून लवकरच जागा उपलब्ध होईल. कांजूर येथील जागा निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई शहर व दोन्ही उपनगरात वेळीच लसीचे वितरण करणे शक्य व्हावे म्हणून कांजूर येथील जागा निवडली आहे. पालिका व खाजगी रुग्णालयात उपलब्ध लस वितरीत करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टास्कफोसर्च्या बैठकीत लसीकरणाबाबत सूचना करण्यात आल्या. काही महत्वाच्या सूचनांचा विचार केला जाणार आहे. लसीकरणावर पालिकेचेच नियंत्रण राहील, यादृष्टीने खासगी आरोग्य सेवेतील कर्मचा-यांनाही निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. यासाठी पथके निर्माण केली जाणार आहे, प्रत्येक पथकात दोन परिचारिका, एक बहुपयोगी कर्मचारी तसेच चार जणांचा चमू तयार केला जाणार आहे. अशा पाच चमूंना मार्गदर्शन करणारा एक डॉक्टर असेल. लसीकरणानंतर काही त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार करण्याची तयारीही उपलब्ध असणार आहे.
तीन टप्प्यात लस देणार -
पहिल्य़ा टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी, दुस-या टप्प्यात, पॅरामेडिकल स्टाफ. पोलिस, सफाई कर्मचा-यांना दिली जाईल. तिस-या टप्प्य़ात ५० वर्षावरील व्यक्ती व काही आजार असलेल्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा दुसरा टप्पा २१ व २८ दिवसांनी दिला जाणार आहे.
काळाबाजार रोखण्य़ासाठी नियोजन -
लस देताना काळाबाजार होऊ नये यादृष्टीने पालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी लसीकरणाची जबाबदारी कोणत्याही खासगी संस्थेला न देता पालिकेच्या कर्मचा-यांवर असेल. लसीकरणासाठी काही एनजीओनींही मदतीसाठी विचारणा केली आहे. त्याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.
सॉफ्टवेअर तयार करणार --
लसीकरणासाठी सॉफ्टवेअर तयार केले जाणार आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये ओटीपी येईल. हा ओटीपी काऊंटरवर ओळखपत्र तपासणार कर्मचा-याला दाखवल्यानंतर लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी नावांची यादी, पत्ते मागवण्यात आले आहेत. त्यांचा डाटा तयार केला जाणार आहे. एका व्यक्तीला दोनवेळा लस दिली जाऊ नये त्यासाठी डाटा आवश्यक असेल.
No comments:
Post a Comment