बेस्टच्या दोन बसमध्ये चिरडून मृत्यु - ४७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2020

बेस्टच्या दोन बसमध्ये चिरडून मृत्यु - ४७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश



मुंबई - पाच वर्षांपूर्वी रस्ता ओलांडताना बेस्टच्या दोन बसमध्ये चिरडून मृत्युमुखी पडलेल्या खासगी कंपनीतील ३७ वर्षांच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ४७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा लवादाने बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.

अहमद शेख (३७) हे विक्री आणि विपणन कार्यकारी म्हणून एका खासगी कंपनीत नोकरीला होते. ते महिना १८ हजार रुपये कमावत होते. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच १५ जुलै २०१५ रोजी शेख हे कामानिमित्त साकीनाका परिसरात गेले होते. त्या वेळी अंधेरी-घाटकोपर लिंक रोड येथे रस्ता ओलांडताना घाटकोपरच्या दिशेने येणाऱ्या बेस्टच्या बसने त्यांना धडक दिली आणि ते बेस्टच्या दोन बसमध्ये चिरडले गेले. शेख यांचा जागीच मृत्यू झाला. शेख यांच्या भावाने या प्रकरणी बसच्या चालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

शेख यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यावर त्यांची पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलांच्या वतीने लवादाकडे दावा करण्यात आला. तसेच ५५ लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली गेली. परंतु शेख यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना बेस्ट प्रशासनाने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. शेख यांच्या चुकीमुळेच अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बेस्टने केला. दोन बसमध्ये खूप कमी अंतर असल्याचे दिसून आणि बसचा चालक हॉर्न वाजवत असल्याकडे दुर्लक्ष करून शेख यांनी रस्ता ओलांडला. त्यांनी झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडण्याचेही टाळले. बसचा चालक योग्य त्या गतीनेच बस चालवत होता व तातडीने ब्रेक दाबून त्याने अपघात टाळण्याचा प्रयत्नही केला, असेही बेस्ट प्रशासनातर्फे लवादाला सांगण्यात आले.

लवादापुढे बसचालकाचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्यानेही तो प्रतितास एक किमी वेगाने बस चालवत होता, असे लवादाला सांगितले. परंतु वाहन निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवले जात होते की नाही याला वाहनाचा वेग हा निकष असू शकत नाही, असे लवादाने म्हटले. तसेच बसच्या चालकाने दिलेल्या साक्षीचा दाखला देत शेख हे त्याच्या बससमोर कसे आले यातून त्याचा निष्काळजीपणा दिसून येतो. पोलिसांच्या सादर केलेल्या पुराव्यांतूनही शेख यांचा दोन बसमध्ये चिरडल्याने मृत्यू झाल्याचे आणि बसचालकाने बस दुसऱ्या बसवर जवळजवळ आदळलीच होती हे स्पष्ट होते. या सगळ्यातून बसचा चालक बेदरकारपणे बस चावलत होता हे सिद्ध होते, असे नमूद करत लवादाने शेख यांच्या कुटुंबीयांना ४७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad