मुंबई दि. 13 - रिपब्लिकन पक्षाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभला आहे. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्माचे लोक प्रवेश करीत आहेत.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी शिस्तीत आणि गांभीर्यपूर्वक करावी.
येत्या दि 10 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेऊन निवडणूक आयोगाला अहवाल देण्यात येणार आहे. त्यामुळे दि 10 जानेवारी पूर्वी सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांनी पूर्ण करावी. पक्षसदस्य नोंदणी जे कार्यकर्ते करणार नाहीत त्यांना पक्षसंघटनेत स्थान मिळणार नाही असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
मुंबईत भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित रिपाइं मुंबई प्रदेश च्या बैठकीत रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमाताई आठवले, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, काकासाहेब खंबाळकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
मागील 2012 च्या मुंबई मनपा निवडणुकीत रिपाइंचा केवळ 1 नगरसेवक निवडून आला तर 2017च्या मुंबई मनपा निवडणुकीत रिपाइंचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणून पक्षाची ताकद दाखविली पाहिजे. त्यासाठी आताच मागासवर्गीयांची; मुस्लिमांची ; हिंदी भाषिकांच्या; दक्षिण भारतीयांच्या वस्त्यां अधिक असणाऱ्या वॉर्डची निवड करा. मुंबईतील किमान 55 जागा निवडून त्यावर भर द्या. त्यातील किमान 35 जागा रिपाइं तर्फे निश्चित आपण जिंकू शकू अशी वर्षभरात तयारी करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सीमाताई आठवले यांनी कोरोनावर मात करून आल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोना वर जशी मात केली तशी आगामी निवडणुकीत काँग्रेस; राष्ट्रवादी आणि शिवसेने वर रिपब्लिकन पक्षाने मात करावी असे आवाहन रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर यांनी केले. मुंबई महापालिकेवर भाजप चा महापौर तर आरपीआय चा उपमहापौर निवडून येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.यावेळी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे पुत्र सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
राज्यात आगामी वर्षभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुंबई; नागपूर सारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी चांगली होण्यासाठी ; राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आणि पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी रामदास आठवले यांनी राज्यात विभाग निहाय बैठकांचा दौरा सुरू केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची बैठक शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी घेतल्या नंतर आज रविवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता नागपूरच्या सामाजिक न्याय भवन येथे रिपब्लिकन पक्षाच्या विदर्भ विभागाची बैठकिला रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.
मुंबई ; नागपूर नंतर रिपाइं च्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पुणे येथे दि. 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून त्यानंतर रिपाइं च्या उत्तर महाराष्ट्राची बैठक शिर्डी येथे दि.28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रिपाइंच्या मराठावाडा विभागाची बैठक औरंगाबाद येथे दि.29 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर रिपाइं च्या कोकण विभागाची बैठक पनवेल येथे दि.30 डिसेंबर घेण्यात येणार. त्यानंतर ठाणे प्रदेशची बैठक दि. 3 जानेवारी रोजी सायलंट रिसॉर्ट मनोर पालघर येथे घेण्यात येणार आहे. या सर्व विभागीय बैठकांना रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.
No comments:
Post a Comment