मुंबई, दि. १८ डिसेंबर, २०२० :- म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे निसर्गरम्य आडगांव शिवारातील श्रीराम नगर-कोणार्क नगर येथे मध्यम उत्पन्न गटातील ४९ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज विक्री व स्वीकृतीला म्हाडाच्या नाशिक कार्यालयातून प्रारंभ झाला आहे. १४ जानेवारी, २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
एक रक्कमी खरेदी तत्वावर विक्री केल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक सुविधांसह युक्त सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. म्हाडा नाशिक मंडळाच्या गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, आयकर भवन समोर येथील मिळकत व्यवस्थापक यांच्या कार्यालयात दिनांक १३ जानेवारी, २०२१ पर्यंत कार्यालयीन दिवशी व वेळेत अर्ज विक्री केली जाणार आहे. तसेच १४ जानेवारी, २०२१ पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
दिनांक २७ जानेवारी, २०२१ रोजी म्हाडा नाशिक मंडळाच्या कार्यालयात प्राप्त अर्जांची सोडत काढण्यात येणार आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता ६०.३६ चौरस मीटर पासून ६१.६९ चौरस मीटर पर्यंत चटई क्षेत्रफळाच्या या सदनिका रुपये २२ लाख ५० हजार ते रुपये २२ लाख ९० हजार पर्यंत अर्जदारांना उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदाराचे मासिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५०,००१ रुपये ते रुपये ७५,००० पर्यंत असणे गरजेचे आहे.
बैठक खोली,स्वयंपाक खोली, २ शयनकक्ष (एकास अटॅच टॉयलेट) बाल्कनी, १ स्वतंत्र अटॅच टॉयलेट बाथरूम, ग्रिलसह अल्युमिनियम खिडक्या, व्हिट्रीफाइड टाईल्स ही सदनिकेची वैशिष्ट्य आहेत. तसेच पार्किंग, सात मजली आर सी सी इमारत, तीन लिफ्ट (डीजी सेट बॅक अप सह), प्रशस्त जिने, फायर फायटिंगची सुविधा, इमारतीच्या तळ मजल्यावर सामायिक कव्हर्ड पार्किंग, सामायिक कंपाऊंड वॉल अशा अत्याधुनिक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सोडतीत समाविष्ट करण्यात आलेल्या सदनिकांच्या वाटपासंबंधी सविस्तर अटी व शर्ती म्हाडा नाशिक मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध होतील, अशी माहिती नाशिक मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली.
No comments:
Post a Comment