मुंबई - धारावीपाठोपाठ शनिवारी दादरमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. धारावीत दिवसभरात केवळ एक तर माहीम परिसरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.
आशियातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. धारावीत गेले तीन-चार महिने या विभागातील रुग्णांचा आकडा एक अंकी आहे. शुक्रवारी धारावीमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नव्हता. शनिवारीही यात सातत्य होते. केवळ एक बाधित रुग्ण सापडला. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्यामुळे सतत वर्दळ असलेल्या दादरमध्येही आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. काही महिन्यांपूर्वी दादरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे जी उत्तर विभाग कार्यालयाने विनामूल्य चाचणी केंद्र सुरू केली. येथील फेरीवाले, दुकानदार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी या सर्वांची चाचणी सध्या केली जात आहे. ३० एप्रिलनंतर पहिल्यांदाच दादरमध्ये एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही.
No comments:
Post a Comment