मुंबई - जगभरात आधीच कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला नसताना, ब्रिटनमध्ये या विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि युकेमधून भारतात आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत एअरपोर्टवर आलेल्यांपैकी २७ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. तसेच, १० प्रवासी कोरोना निगेटिव्ह झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हॉटेलमध्ये क्वारंटाइन -
मुंबईत मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आरोग्य विभाग कोरोनाला रोखण्याचे काम करत आहे. कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश आले असतानाच ब्रिटन आणि युकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. या नव्या विषाणूमुळे ब्रिटन युकेमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लंडन, युके येथून येणारी विमाने २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहेत. २१ ते २३ डिसेंबरदरम्यान मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
२७ प्रवासी पॉझिटिव्ह -
ब्रिटन आणि युके येथून आलेल्या २,६४० पैकी १,४५० प्रवाशांच्या नियमाप्रमाणे ७ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. या चाचणीत एकूण २७ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे व्हाया दुबईहूनही आलेल्या प्रवाशांचाही यात समावेश आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. २७ पॉझिटिव्ह पैकी १० प्रवासी आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. प्रवासी निगेटिव्ह आले तरी त्यांचे अहवाल पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याने या २७ प्रवाशांना सेव्हन हिल रुग्णालयातच विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे.
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल -
अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या २७ प्रवाशांना सध्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सेव्हन हिल्समध्ये ब्रिटनहून आलेल्या पॉझिटिव्ह प्रवाशांसाठी 100 डेडिकेटेड बेड आहेत. या पॉझिटिव्ह प्रवाशांना स्वतंत्र वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयए) तपासणीसाठी पाठवले आहेत. २७ पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने नव्या कोरोना स्ट्रेनचे आहे, की नाही याबाबतचे अहवाल लवकरच येतील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यांचा शोध सुरू..
२५ नोव्हेंबरपासून मुंबईत आलेली प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान मुंबईत २,६४० प्रवासी आले. या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाने मुंबई महापालिकेला दिली आहे. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची तपासणी पालिकेचा आरोग्य विभाग आणि वॉर्ड कार्यालयाकडून केली जात आहे. दरम्यान, गृहनिर्माण संस्थानी आपल्याकडे कोणी परदेशी प्रवासी आला असल्यास त्याची माहिती वॉर्ड कार्यालय आणि आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
No comments:
Post a Comment