मुंबई- मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवाहन करूनही मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत 1 लाख 60 हजार 279 नागरिकांवर कारवाई केली असून 3 कोटी 49 लाख 34 हजार 800 रुपये इतका दंड वसूल केला आहे. तसेच दंड न भरणाऱ्या नागरिकांना रस्ता साफ करण्याची तसेच इतर शिक्षा दिली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मास्क लावले नाही किंवा रस्त्यावर थुंकल्यास संबंधितांकडून 1 हजार रुपये इतका दंड वसुल करण्यात येत होता. मात्र कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने दंडाची रक्कम कमी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयातील 5 ते 6 विभागांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होता. यामुळे या विभागात कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जात होती. मुंबईत मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक मास्क लावत नाहीत त्यांच्याकडून पालिकेने 200 रुपये दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
कोणत्या विभागात किती दंड वसुली
- झोन 1 मध्ये 29,938 नागरिकांवर कारवाई करून 65,56,100 दंड वसूल करण्यात आला आहे.
- झोन 2 मध्ये 28,292 नागरिकांवर कारवाई करून 59,89,700 दंड वसूल करण्यात आला आहे.
- झोन 3 मध्ये 19,716 नागरिकांवर कारवाई करत 42,28,800 दंड वसूल करण्यात आला आहे.
- झोन 4 मध्ये 20,908 नागरिकांवर कारवाई करत 47,31,000 दंड वसूल करण्यात आला आहे.
- झोन 5 मध्ये 21,312 नागरिकांवर कारवाई करत 47,25,900 दंड वसूल करण्यात आला आहे.
- झोन 6 मध्ये 19,266 नागरिकांवर कारवाई करत 38,97,800 दंड वसूल करण्यात आला आहे.
- झोन 7 मध्ये 20,847 नागरिकांवर कारवाई करत 48,05,500 दंड वसूल करण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक दंड
सर्वाधिक दंड वसुली पालिकेच्या सीएसएमटी, भायखळा, मरिन लाइन्स, मस्जिद बंदर व डोंगरी या भागातून करण्यात आली आहे. या भागातील विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या 29 हजार 938 लोकांवर कारवाई करत 65 लाख 56 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मास्क नाही, तर रस्ता साफ करा!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्या आणि दंड न भरणार्यांना आता पालिका समाजसेवेचा धडा देऊ लागली आहे. दंड न भरणार्यांना आता कचरा गोळा करणे, ज्येष्ठांना मदत करणे, स्वच्छता करणे, कोरोना सेंटरमध्ये काम करणे यासारखी कामे करावी लागणार असल्याची माहितीपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
No comments:
Post a Comment