याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धारावी येथील शाहू नगर पोलीस ठाण्यांर्गत कोझी शेल्टर बिल्डिंग, पालवाडी, धारावी क्रॉस रोड या ठिकाणी ही इमारत ही 7 माळ्याची आहे. या इमारतीतील 4 थ्या मजल्यावर रूम क्र. 402 मध्ये राहणारा लहान मुलगा मोहम्मद हुजैफा सर्फराज शेख (वय 5 वर्षे) हा शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) दुपारी 12.45 वा त्याची 7 वर्षांची मोठी बहीण व 3 वर्षाची लहान बहीण यांच्यासोबत या इमारतीच्या लिफ्टमधून तळमजल्यावरून (ग्राउंडफ्लोअर) 4 थ्या मजल्यावर त्याच्या घरी जात असताना लिफ्ट 4 थ्या माळ्यावर पोहोचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचे स्लायडिंग लोखंडी ग्रील सरकवून बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून लिफ्टच्या बाहेर गेल्या. त्यानंतर तो लहान मुलगा बाहेर जाताना तो लिफ्टचे लोखंडी ग्रील बंद करत असताना त्याला बाहेर जाता न आल्याने समोरील लाकडी सेफ्टी दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट सुरु होऊन हा मुलगा लिफ्टच्या लोखंडी ग्रील व लाकडी दरवाज्यामध्ये अडकून लिफ्ट वर गेल्यानंतर लिफ्टच्या खालील मोकळ्या जागेत पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मृत झाला. सायन रुग्णालयात त्या मुलास उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही फुटेज असून संशयास्पद असे काही आढळले नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूनगर पोलीस ठाण्यातर्फे या इमारतीतील रहिवाशी, पालक तसेच हद्दीमधील लिफ्ट असलेल्या इतर रहिवाशांना आपल्या मुलांना लिफ्टमधून एकटे न सोडण्याबाबत आणि लिफ्टमन शिवाय लिफ्टमध्ये प्रवेश न करण्याबाबत सूचना व आवाहन करण्यात आल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment