मुंबई दि. 28 : – राज्यातील कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन ही वन विभागाच्या कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानची मुख्य जबाबदारी असून त्या अनुषंगाने काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. कांदळवन प्रतिष्ठानची वार्षिक बैठक मुंबई येथे श्री. संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रतिष्ठानचे मुख्य आश्रयदाते असून त्यांच्या निर्देशानुसार ही वार्षिक बैठक घेण्यात आल्याची माहिती मंत्री राठोड यांनी दिली.
या बैठकीत मागील आर्थिक वर्षातील खर्च 17.27 कोटी रुपये तसेच या वर्षाच्या 21 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. कांदळवन संरक्षणासाठी 117 सुरक्षारक्षक आहेत. त्यात वाढ करून 183 करण्याचा तसेच भांडुप येथील कांदळवन क्षेत्र पक्षी निरीक्षणासाठी विकसित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याकरिता इंटरप्रिटेशन सेंटर व स्वागत कमान उभारण्याचे ठरविण्यात आले.
कांदळवन लागवडीचा आराखडा तयार करावा असे सांगून जास्तीत जास्त कांदळवन लागवड वाढवावी, अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या. उभादांडा, वेंगुर्ला येथे 21 कोटी रुपयांचे खेकडा, जिताडा, शिंपले बीज निर्माण केंद्र तयार करण्यास तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली असून मत्स्य विकास विभाग व वन विभाग हा प्रकल्प संयुक्तपणे राबविणार आहे.
ऐरोली येथे किनारी व सागरी जीवांचे ‘जायंट ऑफ द सी’ संग्रहालय बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास 10 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्राची आवड आणि माहिती व्हावी याकरिता ‘सागरी बाल वैज्ञानिक’ परिषद आयोजित करण्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे.
या बैठकीस सदस्य आमदार वैभव नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधान मुख्य वन संरक्षक रामबाबू,राज्य मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष रामदास रंधे, सदस्य सचिव तथा अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी, मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment