देशातील अन्य शहरांतील मेट्रोसेवा केंद्राच्या परवानगीनंतर सप्टेंबर महिन्यातच सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईतील मेट्रो सेवेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्य सरकारने आज अनलॉक प्रक्रियेत आणखी काही निर्णय घेतले असून त्यात मेट्रो रेल्वे सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या गुरुवार दि. १५ ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी ग्रंथालये उद्यापासून सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, नियमितपणे सॅनिटेशन करावे, असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे लागू असतील असेही सांगण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोन वगळून अन्य भागांत व्यापार प्रदर्शनांनाही परवानगी देण्यात आली आहे. याबाबत उद्योग विभागाची मार्गदर्शक तत्वे पाळावी, असे नमूद करण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आठवडा बाजार भरत असतात. हे बाजार लॉकडाऊन दरम्यान गेल्या सात महिन्यांपासून बंदच आहेत. ' अनलॉक 'च्या पाचव्या टप्प्यात या बाजारांना दिलासा मिळाला आहे. उद्यापासून हे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक छोट्या शहरांमध्ये जनावरांचेही बाजार भरतात. ते सुरू करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम लागू असणार आहेत.
दरम्यान, राज्यातील शाळा, कॉलेजांबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळा, कॉलेज तसेच अन्य सर्व शैक्षणिक आणि कोचिंग संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहतील, असे नमूद करण्यात आले आहे. मुंबई लोकल बाबतही कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात लोकल सुरू होण्याची शक्यता धुसर बनली आहे.
No comments:
Post a Comment